मुंबई : मुंबई महापालिका समुद्रातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी शहर आणि उपनगरात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त कामांसाठी पुनर्वापर करण्यासाठी सात ठिकाणी 17,182 कोटी रुपये खर्चून मलजल प्रक्रिया प्रकल्प उभारत आहे. यापूर्वी कुलाबा येथे अगोदरच एक मलजल प्रक्रिया केंद्र उभारले आहे.
या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांद्वारे रोज 2,464 दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यातून 50 टक्के प्रक्रियायुक्त पाणी समुद्रात सोडण्यात येईल, तर उर्वरित 50 टक्के पाणी इंधन कंपन्या, नेव्ही, स्पोर्ट क्लब आदींना विकण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.
भविष्यात कदाचित 100 टक्के पाणी प्रक्रिया करून त्याचा पिण्याच्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वाढत्या लोकसंख्येच्या हिशोबाने 2051 पर्यंत वापर करण्याचे नियोजन केले आहे. नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता व सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार आहे. तसेच, मलजल प्रकल्पांतर्गत मलजल प्रक्रिया केल्यानंतर शेवटी शिल्लक राहणार्या गाळापासून खत अथवा इंधन निर्मिती करण्याचा प्रयत्न असणार आहे.
त्याचप्रमाणे, महापालिका प्रक्रियायुक्त पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याच्या विक्रीतून काही प्रमाणात उत्पन्नही मिळवणार आहे. तसेच वांद्रे येथील मलजल प्रक्रिया केंद्राच्या जागेत मुलांच्या माहितीसाठी नॉलेज सेंटर व सदर केंद्र बंदिस्त करून वरील जागेत मोठे उद्यान बनविण्यात येणार आहे. तसेच, समुद्राच्या दिशेने एक प्रेक्षागॅलरीही उभारण्यात येणार आहे. वांद्रे येथील प्रकल्पाच्या ठिकाणी मिठी नदीतील दूषित पाण्यावरही प्रक्रिया करण्यात येणार आहे. एकंदर, महापालिकेसाठी सदर सात मलजल प्रक्रिया केंद्र बहुउद्देशीय लाभ देणारे प्रकल्प ठरणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तशी पूर्वतयारी केली आहे.
कुलाबा केंद्रातील मलजल प्रक्रिया केलेल्या पाण्याचा नेव्हीला अल्प दरात पुरवठा करण्यात येत आहे. वेलिंग्टन क्लबलाही अल्प दरात प्रक्रियायुक्त पाण्याची विक्री करण्यात येत आहे. तसेच, घाटकोपर येथील प्रकल्पातून प्रक्रियायुक्त पाण्याचा पुरवठा एचपीसीएलसारख्या इंधन कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार करण्यात येणार आहे. त्यातून मनपाला काही प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. भविष्यात आवश्यक तेथे प्रक्रियायुक्त पाण्याचा जलवाहिनीद्वारे अथवा टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) तथा प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे, उपप्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांनी सांगितले.
सात मलजल प्रक्रिया केंद्रांच्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यावर निर्माण होणार्या बायोगॅसपासून विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. या सात केंद्रांच्या ठिकाणी त्यांना आवश्यक विजेच्या तुलनेत किमान 20 टक्के विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. या विजेचा वापर मलजल केंद्राच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तेवढ्या विजेच्या खर्चाची बचत होणार आहे.
वरळीमध्ये 500 दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे 360 दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये 454 दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये 337 दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीत 418 दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये 215 दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे 180 दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण 7 केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे.