Mumbai Underground Parking: उद्यान व मैदानाखाली भूमिगत पार्किंग! २०२७ मध्ये शुभारंभ

डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प अहवाल तयार करणार
Mumbai parking
Mumbai parking Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई शहर व उपनगरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने उद्यान व मैदानाखाली भूमिगत पार्किंगला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून या प्रकल्पाचा शुभारंभ २०२७ मध्ये साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईत पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. दक्षिण मुंबईत कामानिमित्त यायचे झाले तर नेमकी गाडी कुठे उभी करणार, असा प्रश्न पडतो. अनेकदा पार्किंग नसल्यामुळे रस्त्याच्याकडेला पदपथाला लागून गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत.

Mumbai parking
Anant Ambani Tirumala Visit: तिरुमला येथे अनंत अंबानी यांचे केशदान

त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांकडून अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येते. यात वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील उद्यान व मैदानाखाली पार्किंग करता येईल ही नाही याबाबत काही वर्षांपूर्वी अभ्यास केला होता. परंतु हा प्रकल्प कागदावरच राहिला. मात्र आता या प्रकल्पाला चालना देण्यासाठी लवकरच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

मुंबई शहर पश्चिम व पूर्व उपनगर या भागात असलेल्या उद्यान व मैदानापैकी नेमकी पार्किंगसाठी कोणती जागा उपयुक्त ठरू शकेल, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.

मैदानात व उद्यानाखाली पार्किंग केल्यावर त्याचा उद्यान व मैदानावर परिणाम होणार की नाही याबाबतही अभ्यास करण्यात येणार आहे. भूमिगत पार्किंग करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांकडून हरकती, सूचनाही मागवण्यात येणार आहेत.

नागरिकांच्या सूचनेनुसार हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही वर्षांपूर्वी अंधेरी पश्चिमेकडील नवरंग सिनेमा समोरील उद्यानाखाली पार्किंग व फेरीवाले बसवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र हा प्रकल्प पुढे सरकलाच नाही.

Mumbai parking
Youth Congress protest: शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन; राजीनाम्याची मागणी

३८ हजार गाड्यांसाठी पार्किंग उपलब्ध

मुंबई शहर व उपनगरात रस्त्यावर ६५ सशुल्क पार्किंग सध्या कार्यान्वित आहेत. त्यांची एकूण वाहन क्षमता ८,२५८ इतकी आहे. याव्यतिरिक्त महापालिकेला इमारत व्यावसायिकांकडून ३७ ठिकाणी सार्वजनिक पार्किंग चालवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून येथील पार्किंगची एकूण क्षमता २९ हजार ७६९ इतकी आहे.

भूमिगत दोन मजली पार्किंग करणे शक्य

उद्यान अथवा मैदानाखाली दोन मजली पार्किंग उपलब्ध करणे शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्किंगमध्ये किमान २०० ते २५० गाड्या उभ्या राहतील, एवढी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. विशेषत: दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कोणत्या उद्यान व मैदानाखाली भूमिगत पार्किंग करता येईल याचा अभ्यास करण्यात येणार आहे. महापालिकेची ही योजना सफल झाल्यास पार्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news