

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचनेचे काम सुरू झाले असून या पुनर्रचनेत मतदार गमावण्याची भीती माजी नगरसेवकांना आहे. त्यामुळे या पुनर्रचनेकडे त्यांचे विशेष लक्ष लागले आहे. प्रभागाची हद्द बदलली तर, हरकती-सूचनांच्या वेळी त्यांना आपली बाजू मांडता येणार आहे.
मुंबईत 227 प्रभाग असून फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी प्रभागांची हद्द निश्चित करण्यात आली होती. यावेळी प्रभागांमध्ये तोडफोड करण्यात आल्यामुळे तत्कालीन अनेक नगरसेवकांना आपले मतदार गमवावे लागले होते. त्यामुळे यावेळीही प्रभाग पुनर्रचनेत मतदार गमावण्याची भीती माजी नगरसेवकांना आहे.
हद्द निश्चित करताना, ज्या प्रभागात अन्य प्रभागांपेक्षा जास्त मतदार आहेत अशा प्रभागांची हद्द बदलून त्यातील काही मतदार अन्य प्रभागांमध्ये टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्वीपासून त्या प्रभागात काम करणार्या माजी नगरसेवकांना आपले हक्काचे मतदार गमवावे लागणार आहेत. उदाहरणार्थ 60 नंबर प्रभागातील मतदारांची संख्या 60 हजारापर्यंत पोचली व त्याच्या बाजूच्या 61 व 62 मतदार संघात मतदार संख्या 50 हजार व त्यापेक्षा कमी असेल तर अशा मतदारसंघात 60 नंबरच्या प्रभागातील वाढीव मतदारांचा समावेश करण्यात येणार आहे.
जर समावेश करण्यात येणारे मतदार पूर्वीप्रमाणे शिवसेना अथवा भाजपाचे असतील तर तेथील त्या त्या उमेदवाराला महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रभाग पुनर्रचना करताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेण्यात यावे असे मत भाजपाचे उपाध्यक्ष माजी विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी व्यक्त केले. प्रभाग पुनर्रचनेत त्याचे मतदार अन्य प्रभागात गेल्यास केवळ मताधिक्यच घडत नाही तर, विजयासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. काही अवधीत पुन्हा प्रभाग बांधावा लागतो. तसेच नगरसेवकांनी सुचवलेल्या सूचना किंवा घेतलेली हरकत मान्य होईलच याची खात्री नसल्याचेही राजा यांनी सांगितले.