मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर तलावाच्या धरण क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्याचा मुंबई महापालिकेने अंतिम निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणारा खर्च महाप्रित ही कंपनी करणार असून प्रकल्पाचे देखभाल 25 वर्षाच्या कालावधीसाठी महाप्रितकडे असणार आहे. या प्रकल्पातून तब्बल 100 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे.
तानसा, मोडक सागर, विहार, तुळशी व पवई तलाव येथे तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणी संदर्भात जुलै 2025 मध्ये बैठक पार पडली होती. यावेळी सौरऊर्जा प्रकल्प उभारणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तानसा व मोडक सागर धरण येथे 100 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प महाप्रितद्वारे बांधा, वित्त पुरवठा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर 25 वर्षाच्या कालावधीसाठी विकसित करण्यास सहमती दर्शविण्यात आली.
या बैठकीत महाप्रितने 25 वर्षांच्य कालावधीसाठी 100 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी रुपये 5 कोटी 89 लाख प्रति मेगावॅट इतका खर्च विचारात घेऊन 4 रुपये 53 पैसे प्रति युनिट असा दर सुचवला आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाची लवकरच सुरुवात होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
या प्रकल्पाद्वारे वार्षिक अंदाजे 219 दशलक्ष युनिट विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे. प्रकल्पामुळे निर्माण होणारी विद्युत उर्जा ही 25 वर्षाकरिता समतल (स्थिर) दर 4 रुपये 25 पैसे युनिट इतक्या दराने मुंबई महानगरपालिकेस मिळणार आहे. सौर ऊर्जेतून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे सरासरी वार्षिक खर्चात 165.51 कोटी रुपयाची बचत अपेक्षित आहे.
महाप्रित सरकार मान्यता कंपनी
जुलै 2023 शासन निर्णयाद्वारे महात्मा फुले बॅकवर्ड क्लास डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची उपकंपनी महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडला ( महाप्रित) मान्यता दिली असून महाप्रितला शासन ते शासन तत्वावर विविध सरकारी विभागांची कामे करण्यास अधिकृत केले आहे. ही कंपनी अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान प्रकल्प विकासाचे काम करते.