

मुंबई : भारतासह जगभरातील खगोलप्रेमींनी ‘ब्लड मून’ अर्थात मोठ्या चंद्रग्रहणाच्या अद्भुत नजार्याची अनुभूती घेतली. भारतात तब्बल 82 मिनिटे चंद्रग्रहणाची अनुभूती घेता आली. हे ग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्येही दिसले. या चंद्रग्रहणास रात्री 9.30 नंतर सुरुवात झाली व रात्री 11.48 च्या सुमारास ते परमोच्च बिंदूवर पोहोचले.
खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे गंगा आरती रविवारी दुपारीच संपन्न झाली. श्री गंगा सभेचे सरचिटणीस तन्मय वशिष्ठ यांनी सांगितले की, धार्मिक परंपरेनुसार ग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो. हे लक्षात घेऊन मंदिरांचे दरवाजे दुपारी 12.57 वाजता बंद करण्यात आले आणि त्यामुळे सायंकाळची गंगा आरती सुतक काळापूर्वी दुपारी 12.30 वाजता करण्यात आली.
‘ब्लड मून’ म्हणजे नेमके काय?
शास्त्रज्ञ निरूज मोहन रामानुजम यांनी ‘ब्लड मून’मागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, खग्रास ग्रहणावेळी जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा काही सूर्यप्रकाश अपवर्तित होऊन चंद्रावर पडतो. यामुळे चंद्र पूर्णपणे काळा न दिसता तांबूस किंवा रक्तासारख्या लाल रंगाचा दिसतो, ज्याला ‘ब्लड मून’ म्हटले जाते.