

मुंबई : बीकेसीतील सायकल मार्गिका अखेर हटविण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. शीव उड्डाणपूल बंद असल्याने बीकेसीत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून मार्गिका काढण्यात येणार असून रस्ते रूंद होऊन कोंडीची समस्या सुटेल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने तयार केलेल्या या योजनेला प्राधिकरण बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता 600 ते 900 वाहनांनी वाढेल. रस्त्यावरील दिवे, साइनबोर्ड, झाडे, बस थांबे आणि सुशोभीकरणासाठी लावलेले घटक पदपथावर हलवण्यात येतील. ही योजना हे दीर्घकालीन वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.
सुमारे 370 हेक्टर क्षेत्रात पसरलेले वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र आहे. सध्या येथे दररोज सुमारे 2 लाख कर्मचारी आणि 4 लाखांहून अधिक अभ्यागत येतात. गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी ही येथील एक गंभीर समस्या झाली आहे. त्यात शीव उड्डाणपूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वळवण्यात आली आहे. बीकेसी मार्ग हा प्रामुख्याने लहान वाहनांसाठी अनुकूल आहे. मात्र, सध्या ट्रक, अवजड वाहने व मालवाहतूक होत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीएने तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे ठरवले आहे. प्राधिकरणाने एक विस्तृत वाहतूक व्यवस्थापन योजना तयार केली आहे. याचा भाग म्हणून ही सायकल मार्गिका काढून टाकण्यात येणार आहे.
एक पेट्रोल कार दर किमीला सुमारे 170 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते. सरासरी 40 किमी प्रतितास वेगाने 2.3 किमीचा प्रवास करताना कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन 30 टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित असून ते प्रतिवाहन 1 हजार 133 ग्रॅमवरून 793 ग्रॅम इतके होईल.
वाहनांचे अंतर्गत दळणवळण सुरळीत करण्यासाठी बीकेसीमधील सर्वात व्यग्र भागातील कोंडी कमी करण्यासाठी बीकेसी भागात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येईल. तज्ज्ञांच्या शिफारसी व वाहतुकीचा अभ्यास यांच्या आधारे ही उपाययोजना राबवल्याने वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल आणि कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
सायकल मार्गिका काढून रस्त्याचे रुंदीकरण 2+2 मार्गिकेवरून 3+3 मार्गिकेपर्यंत करण्यात येईल. म्हणजेच रस्त्याच्या रूंदीत 50 टक्के वाढ होणार आहे. परिणामी, गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांवरून 15 मिनिटांपर्यंत कमी होईल. या 10 मिनिटांमुळे प्रवासी वेळेत 40 टक्के बचत होणार आहे. सिग्नल किंवा अरुंद जागांवर प्रतीक्षा वेळ 10 मिनिटांवरून 7 मिनिटांपर्यंत कमी होईल. 3 मिनिटे म्हणजेच वेळेत 30 टक्के बचत होईल.
सध्या असलेल्या 2+2 मार्गिका (7 मीटर + 7 मीटर) आणि 2.7 मीटरची सायकल मार्गिका असलेला हा रस्ता 3+3 मार्गिकांचा करण्यात येईल (9.7 मीटर + 9.7 मीटर)
सध्या असलेल्या 2+2 मार्गिका (7 मीटर + 7 मीटर) आणि 1.5 मीटरची सायकल मार्गिका असलेला हा रस्ता 3+3 मार्गिकांचा करण्यात येईल (8.5 मीटर + 8.5 मीटर)
सध्या असलेली 1+1 मार्गिका (3.5 मीटर + 3.5 मीटर) आणि 1.5 मीटरची सायकल मार्गिका असलेला रस्ता 2+2 मार्गिकांचा करण्यात येईल (5.0 मीटर + 5.0 मीटर).