

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून येथील सायकल मार्गिका हटवण्यात येत आहे. हे काम 1 ऑगस्टपासून सुरू झाले असून आठवडाभरात पूर्ण होणार आहे. यामुळे रस्त्याची रुंदी वाढून वाहनांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध हाणार असल्याने वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात 10.8 किमी पदपथ आहेत. त्यापैकी 9.9 किमी पदपथासोबत सायकल मार्गिकाही बांधण्यात आल्या आहेत. पदपथाची रुंदी 4 ते 7 मीटर आहे तर सायकल मार्गिकेची रुंदी 1.5 ते 2.7 मीटर आहे. गेल्या काही वर्षांत वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. यामुळे वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवण्याची गरज आहे.
सायकल मार्गिकेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही तिचा वापरच झाला नाही. त्यामुळे ही मार्गिका काढून टाकण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मे महिन्यात जाहीर केला होता.
अशी सुटणार कोंडी
सायकल मार्गिका 1 ऑगस्टपासून काढण्याचे काम सुरू आहे. ही मार्गिका काढल्याने रस्त्याची एक मार्गिका वाढणार असून रस्त्याची वहन क्षमता 600 ते 900 वाहनांनी वाढणार आहे. सिग्नल व अरूंद जागांवरील प्रतीक्षा कालावधी 10 मिनिटांवरून 7 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.