

Opportunities for ordinary workers
मुंबई : प्रकाश साबळे
गेली २५ वर्ष शिवसेना ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. पालिका निवडणूकीच्या पहिल्या उमेदवारी यादीत भाजपाने अनेक माजी नगरसेवकांना डच्चू देवून नवीन आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. तसेच अनुभवी माजी नगरसेवक यांनाही नाराज न करता यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर करून समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महापालिकेत भाजपाला महापौर बसवायचा असल्याने, ज्या वाॅर्डात उमेदवार जिंकून येतील, अशांना संधी देण्याचा पुरेपुर प्रयत्न भाजपाकडून केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीमध्ये ३५ ते ४० नव्या चेहऱ्यांसा संधी देण्यात आली आहे. तसेच विद्यमान आमदार, माजी खासदार, माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांच्या कुटुंबियांतील नातेवाईकांनाही उमेदवारी दिली आहे. जेणेकरून त्या -त्या विभागात भाजपाचा अधिक मताधिक्य मिळविण्यास यश येईल. प्रसिध्द झालेल्या पहिल्या उमेदवारीमध्ये डाॅक्टर, वकिल, उच्च शिक्षित, पत्रकार आदींचा समावेश आहे.
उमेदवार निवडीवर आमदारांची छाप
मुंबई भाजपाकडून सोमवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली. या यादीमध्ये अनेक उमेदवार हे भाजपा आमदार यांच्या कार्यालयातील विश्वासू कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा समावेश आहे.
भाजपा प्रवक्ता, तथा माध्यम प्रतिनिधी नवनाथ बन, रवी राजा, तेजस्वी घोसाळकर, श्वेता कोरगावकर, नील सोमय्या, आकाश पुरोहित, हर्षिता नार्वेकर या नव्या आणि पक्षांतर केलेल्या उमेदवारांना पहिल्या यादीत संधी दिली आहे.