

मुंबई : मंत्रिपदाची हुलकावणी देणारे मुंबईतील भाजप व शिवसेनेचे चार आमदार आजही नाराज आहेत. या आमदारांना विधानसभा अध्यक्षपद व किमान राज्यमंत्रिपदाची अपेक्षा होती; पण राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे महायुतीने मुंबईसाठी निकष न लावल्यामुळे आमदारांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले असल्याची खंत हे आमदार व्यक्त करत आहेत.
राज्यातील एका जिल्ह्यात सरासरी चार ते सात विधानसभा येतात. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात तर तीनच विधानसभा आहेत; पण मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांतील विधानसभेची संख्या तब्बल ३६ आहे. यात मुंबई शहरात दहा विधानसभा तर उपनगरात २६ विधानसभा आहेत. त्यामुळे मंत्रिपदाचे वाटप करताना अन्य जिल्ह्यांप्रमाणे मुंबईचा निकष लावल्यास शहराला किमान २ तर उपनगराला किमान ४ मंत्रिपद मिळणे अपेक्षित असल्याचे महायुतीतील आमदारांचे म्हणणे आहे, पण विद्यमान सरकारमध्ये संपूर्ण मुंबईतून फक्त दोनच मंत्रिपद देण्यात आली. त्यामुळे मंत्रिपदाकडे आस लावून बसलेल्या आमदारांची घोर निराशा झाली आहे. राज्य मंत्रिमंडळात यावेळी चारकोपचे भाजपा आमदार योगेश सागर, गोरेगावच्या विद्या ठाकूर, नागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे व चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडण्याची शक्यता होती. गोरेगावच्या विद्या ठाकूरही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळेल, याकडे डोळे लावून बसल्या होत्या. पण त्यांनाही मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेल्या चांदीवली मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आव्हान असतानाही शिवसेनेचे दिलीप (मामा) लांडे दुसऱ्यांदा आमदार बनल्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता होती; पण त्यांनाही मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे या आमदारांमध्ये सध्या नाराजी दिसून येत आहे. ही नाराजी त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे ही व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मंत्रिपदासाठी शर्यतीत असलेल्या या आमदारांनी पक्षाने जो निर्णय घेतला तो आपल्याला मान्य असल्याचे सांगत, अजून वेळ गेलेला नाही कधी ना कधी आम्ही मंत्री होऊच, असा विश्वासही व्यक्त केला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते योगेश सागर यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता होती. तसेच संकेत त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करत पुन्हा नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदावर बसवण्यात आले. सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले प्रकाश सुर्वे यांनाही किमान राज्यमंत्रीपद मिळेल, असे अपेक्षित होते; पण त्यांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली.