

मुंबई : मुंबईत 1980 साली पक्ष स्थापनेच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने ‘अंधेरा छटेगा, सूरज उगेगा, कमल खिलेगा’ असा द्रष्टा विचार मांडला. त्यानंतर सातत्याने मेहनत करून आपण सत्तेपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे भाजप हा सदैव कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात काढले.
याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री, पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनसंघ ते भाजप या वाटचालीतील तेजस्वी टप्प्यांचा समर्पक आढावा घेतला. ते म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम भाजप करत आहे. शंभर दिवसांच्या कार्यक्रमातून हे सरकार कसे चालणार हे आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि महाराष्ट्राची गती आपण थांबू देणार नाही, हेच आपल्या सरकारचे ध्येय आहे.
राज्याची ही गती योग्य प्रकारे साधायची असेल, तर सरकार आणि पक्ष यांच्यामधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे. त्याचवेळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला असाच प्रचंड विजय मिळवायचा आहे, असा संकल्प करूया, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, कमळ हे देशवासीयांच्या मनात विश्वास आणि आशेचे नवीन प्रतीक बनले आहे. गेल्या दशकात भाजपने जे सेवा, सुरक्षा आणि सांस्कृतिक जागृतीचे कार्य केले, ते येणार्या काळात मैलाचा दगड ठरेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये व्यक्त केले. कोट्यवधी भाजप कार्यकर्ते वैचारिक बांधिलकीशी निष्ठावान राहून देशनिर्मितीत आपले योगदान देत राहतील, असेही शहा म्हणाले.
स्थापनेनंतर अवघे दोन खासदार निवडून येणारा भारतीय जनता पक्ष आज केंद्रासह 21 राज्यांत सत्तेत आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांपासून कन्याकुमारीपर्यंत या पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीनगरमध्ये पक्षाच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली घर घर भाजप मोहीम राबवण्यात आली. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहण करण्यात आले. भाजप या पक्षाची चळवळ बनली, अशा शब्दांत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी भावना व्यक्त केल्या.