

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 246 नगर परिषदा व 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. 288 पैकी 124 ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणले आहेत; तर नगराध्यक्षाच्या 61 जागा जिंकून एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसर्या तर 36 ठिकाणी नगराध्यक्ष बसवून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तिसर्या स्थानी आहे.
शिवसेनेला (उबाठा) 8 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 12 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महायुतीचा डंका जोरदार वाजला असून त्यांनी एकत्रित 221 जागा जिंकून राज्यात सर्वत्र मुसंडी मारली आहे. दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी पीछेहाट झाली आहे. काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तीनही पक्षांना मिळून जेमतेम 47 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला 27 जागा मिळाल्या असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 नगर परिषदांमध्ये विजय मिळाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 8 नगर परिषदांमध्ये विजय मिळाला आहे. 20 ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि अन्य पक्षांनी बाजी मारली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी आलेल्या या निकालाने भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला जात आहे. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे. या निकालाने त्यांच्या समोरील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील आव्हान आणखी वाढले आहे.
राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या असताना स्थानिक पातळीवर निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी महायुतीतील तीन पक्षांतच एकमेकांच्या विरोधात लढत रंगली होती. काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातच युती झाली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
निवडणुकीत 288 पैकी 124 ठिकाणी भाजपने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अन्य भाजप नेत्यांनीही प्रचार केला होता. प्रत्येक नगर परिषद निहाय स्वतंत्र रणनीती आखली होती. त्याचा फायदा भाजपला झाला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती प्रचारयंत्रणा राबविली होती. त्यांनीही 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. तुलनेने विरोधी पक्षाचे बडे नेते प्रचारात दिसले नाहीत. पक्षाकडून कोणतीही रसद मिळत नसल्याने महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढावी लागली. निवडणुकीत काँग्रेसला पूर्व विदर्भाने तारले असून त्या जोरावर त्यांनी राज्यात 27 नगर परिषदांमध्ये आपले नगराध्यक्ष बसविले असले तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाताहत झाली आहे. आता हे अपयश घेऊन महाविकास आघाडीला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या निकालाने महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी उंचावले आहे.