

मुंबई : बीट कॉईन गुंतवणुकीच्या नावाने मुंबईतील ९८ जणांची १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमीत दर्शनाथ भोसले, अमोल युवराज डोके, लक्ष्मण विसराम चौहाण आणि सुजीत जाधव अशी या चौघांची नावे असून यातील अमीत आणि अमोल हे कंपनीचे मालक तर इतर दोघेही कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार भाईंदर परिसरात राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांना या गुंतवणुक स्किमबाबत माहिती मिळाली. लक्ष्मण आणि सुजीतची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्याला ही माहिती दिली होती. गुंतवणुकदारांना चांगला परतावा देत असल्याचा दावा या दोघांनी केला होता. या गुंतवणुकीवर त्यांना काही महिने चांगला परतावा मिळाला होता. या दोघांनी इतरांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या परिचित लोकांसह नातेवाईक आणि मित्रांनी कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली. या सर्वांना फेब्रुवारी २०२२ पर्यंत परतावा मिळत होता. कंपनीने परताव्याची रक्कम देणे बंद केले. कंपनीचे अॅप अचानक बंद झाले. दहिसर येथील कार्यालयालाही टाळे लागले आणि मग लक्ष्मण आणि सुजीत पळून गेल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. एकूण प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कंपनीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. कंपनीचे मालक अमीत भोसले आणि अमोल डोके असल्याचे उघड झाले. वाशी येथे कंपनीचे मुख्य कार्यालय होते, मात्र ते कार्यालय काही महिन्यांपासून बंद होते. या कंपनीत ९८ गुंतवणुकदारांनी १ कोटी ८५ लाखांची गुंतवणुक केली होती, मात्र फेब्रुवारी २०२२ नंतर कोणालाही मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम मिळाली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यासह इतर गुंतवणुकदारांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कंपनीच्या दोन्ही मालकासह चौघांविरुद्ध पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपी पळून गेले. प्राथमिक तपासात ही फसवणुक १ कोटी ८५ लाखांची असली तरी फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.