

मुंबई : शहराला दररोज सर्वाधिक 1 हजार 850 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील भातसा तलावही आता पाण्याने भरत आला आहे. हा तलाव भरण्यासाठी अवघ्या नऊ टक्के पाणी साठ्याची आवश्यकता आहे. दरम्यान सातही तलावातील पाणीसाठा 92.42 टक्केवर पोहचला असून तलाव तुडुंब भरण्यासाठी 1 लाख 10 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत पाच तलाव ओसंडून वाहू लागली असून केवळ नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा व ठाणे जिल्ह्यातील भातसात तलाव ओसंडून वाहणे बाकी आहे.
अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठा 88 टक्के वर पोहचला असून हा तलाव भरण्यासाठी 27 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर भातसा तलाव भरण्यासाठी अजून 66 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेला पाऊस पुढील दोन आठवडे सुरू राहिल्यास भातसा तलावही ओसंडून वाहू लागेल.
मोडक सागर, तानसा व मध्य वैतरणा तलावातील पाणीसाठा काही प्रमाणात घटला होता. परंतु पावसामुळे या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मोडक सागर पुन्हा भरण्यासाठी 10 हजार दशलक्ष लिटर तर तानसा भरण्यासाठी 1 हजार दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. मध्य वैतरणा पुन्हा भरण्यासाठी 5 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.