मुंबई : सत्ताधारी कितीही बलाढ्य असला तरी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून जाब विचारण्याची ताकद असते तो विरोधी पक्षनेता असतो. त्यामुळे विधानसभेत मला विरोधी पक्षनेतेपद मिळेल असे वाटत होते. पण सत्ताधारी मला घाबरत असल्याने ते पद मला मिळू शकले नाही, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केली.
मी आतापर्यंत आठ वेळा निवडून आलेलो आहे. माझ्या घराण्यात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एकमेव राजकारणात प्रवेश केलेली व्यक्ती आहे. मला दिलेले काम मी नेहमी प्रामाणिकपणे करतो. राजकारणात सर्वस्व झोकून देऊन काम केले आहे, तशाच पद्धतीने समाजकारणात केले आहे. पण क्षमतेप्रमाणे काम करायला संधी मिळाली की आनंद वाटतो. काम करायला हुरूप येतो. माणूस अधिक जोमाने काम करतो, असे सांगत पक्षातून मला कोणीही बाजूला केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारण, समाजकारण, उत्सव, शेतीत मी रमतो, पण आता मनात राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे येऊ लागले आहे. सत्तरी जवळ आली अशावेळी शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेतेपद मिळेल असे वाटले होते.
पण सत्ताधारी पक्ष मला घाबरत असल्याने हे शक्य होऊ शकले नाही. कारण विरोधी पक्षनेता कसा असावा, वैधानिक कामे कशी करायची हे सत्ताधार्यांना आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायचे होते. स्वतःचा स्वार्थ काही नाही, असेही जाधव म्हणाले. सत्ताधारी पक्ष माळवणकरांचा संदर्भ देऊन दहा टक्के आमदारांचा नियम पुढे करतात. पण मी कायदा कोळून प्यायलो आहे, असे सांगत जाधव म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता हे घटनेत लिहिलेले आहे. पण सत्ताधारी पक्षाला घटना मान्य नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.