

भांडुप : भांडुपच्या खिंडीपाडा विभागात ओमेगा हायस्कूलमागे मंगळवारी मोठी दरड कोसळली. यात संरक्षक भिंतीसह पाच घरे 50 फुटांवरून खाली आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पन्नास फूट उंच असलेल्या या डोंगरावर तितकीच मोठी संरक्षक भिंत आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्तीदेखील आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास येथील पाच घरांसह ही दरड खाली आली. काही स्थानिकांनी हे थरारक दृश्य कॅमेर्यात कैद केले. खाली कोसळलेली पाचही घरे आधीच रिकामी करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई मनपाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ आजूबाजूची घरे रिकामी केली. या घटनेमुळे भांडुपच्या डोंगराळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील अशा दरडींच्या वस्त्यांवर दै. पुढारीने प्रदीर्घ मालिका गेल्याच महिन्यात प्रसिध्द केली, आणि आता त्या मालिकेत व्यक्त झालेली भीती अनुभवास येऊ लागली आहे.