

मुंबई : श्रीकांत जाधव
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने गेल्या अनेक वर्षात लहान मोठे चढ उतार पाहिले आहेत. साधारण बसपासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसचा प्रवास थक्क करणारा आहे. आता मात्र आर्थिक परिस्थिती बेस्ट राहिली नसल्याने अखेर खाजगीकरणातुन 'कायापालट' करण्याचा मार्ग बेस्टने पत्करला आहे.
याच मार्गान बेस्टच्या ताफ्यात विक्रमी वाढ होणार असून, आगामी काळात 'बेस्ट'च्या गारेगार इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार असे दिसते. शुक्रवारी मुंबई बेस्टचा ७९वा 'बेस्ट दिन' साजरा होत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजेच अवघ्या सात दिवसापूर्वी ७ ऑगस्ट १९४७ ला मुंबई महापालिकेने नऊ कोटी ८६ लाख ५६ हजार ७६५ रुपयांना बेस्ट उपक्रम विकत घेतला. त्यावेळी बेस्ट ताफ्यात अवघ्या २४२ बस होत्या. आज ही संख्या २ हजार ७९२ बसेसची असली तरी बेस्टच्या स्वमालकीच्या फक्त २४९ बसेस आहेत. भाडेतत्वारील मात्र तब्बल २५४३ बस आहेत. आजघडीला बेस्टची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.
मुंबई महापालिकेने आर्थिक मदतीचा हात दिल्यामुळे बेस्ट काही प्रमाणात तरली असली तरी सर्वसामान्य मुंबईकरांची बेस्ट यापुढे टिकाव धरणार का, अशी भीती यंदाच्या वाढदिवस सोहळ्यातही डोकावते आहे. आता आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी बेस्टने मुंबईतील मोक्याच्या जमिनीचा सार्वजनिक खाजगी भागीदारीत विकास करण्याचे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. बेस्ट उपक्रमाचा सर्वसमावेशक 'कायापालट प्रस्ताव' बेस्ट समितीने हॅप्पी बर्थ डे बेस्ट बस @ ७९ Birthday मंजूर केला आहे. मात्र, पीपीपी तत्वाच्या नावाखाली बेस्टच्या २२ आगाराची ३२५ एकर जमीन खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
बेस्टच्या ताफ्यात विक्रमी वाढ !
पूर्वी बेस्टच्या वातानुकूलित बसचे अव्वाच्या सव्वा भाडे होते. सर्वसामान्य व गरिबांना तो प्रवास परवडणारा नव्हता. पण खाजगीकरणाच्या माध्यमातून कंत्राटी एसी बस दाखल झाल्या. येत्या वर्षभरात ३० पीएमआय बस, १,५०० मिडी बस, २,३५० ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस आणि १५० स्विच दुमजली इलेक्ट्रिक बस, अशा ४,०३० बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.
भविष्यात भाडेवाढ अटळ !
८९ वर्षांपूर्वी दीड मैलाच्या प्रवासाकरिता एक आणे भाडे होते. १९६३ ला ३.६ किमी प्रवासासाठी १० पैसे भाडे होते. १९९६ पर्यंत २.५ किमी प्रवासासाठी १ रुपया २० पैसे ते २ रुपये ५० पैसे इतके भाडे होते. मात्र खाजगी बस दाखल होताच अवघ्या ६ रुपयात एसी बसने प्रवास करू लागला होता. आता मात्र पुन्हा भाडेवाढ होऊन किमान भाडे १२ आहे. ते सुद्धा भविष्यत वाढणार आहे.
वार्षिक प्रवासी ७६.४८ कोटी
१५ जुलै १९२६ मध्ये बस वाहतुकीला सुरुवात झाली. पहिल्या वर्षात २४ बस मधून सहा लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट, दादर टीटीपासून पारसी कॉलनीतून किंग सर्कल पर्यंत आणि ऑपेरा हाऊसपासून लॅमिंटन रोड आर्थर रोड मार्गे लालबागपर्यंत अशा तीन मार्गावर बस वाहतूक सुरू होती. आज बेस्टची एकूण प्रवासी संख्या ७६. ४८ कोटी एवढी आहे.
स्वकर्तृत्वावर निधी उभारणीसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीतुन कायापालट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बेस्टची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी तो महत्वाचा आहे.
- सोनिया सेठी महाव्यवस्थापक, बेस्ट