

Mumbai BEST Bus AC Non-AC fare revised
मुंबई : प्रवासी घटले तरी उत्पन्नात घट झालेली नाही, असा दावा करणार्या बेस्ट प्रशासनावर आता भाडेवाढ कमी करण्याची वेळ आली आहे. मे महिन्यानंतर प्रवासी संख्येत पुन्हा मोठी वाढ होईल, असा आशावाद बेस्ट प्रशासनाला होता. मात्र तसे काही घडलेच नाही. उलट, प्रवासी कमी झाल्यामुळे बेस्ट प्रशासनावर ही नामुष्की ओढवली आहे.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट) प्रशासन एसी आणि नॉन-एसी बसेसचे किमान भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. 3 किमीपर्यंतच्या लहान मार्गांवर, एसी बसेसचे किमान भाडे आता 12 रुपयांऐवजी 9 रुपये तर नॉन-एसी बसेसचे किमान भाडे 10 रुपयांवरून 7 ते 8 रुपये केले जाणार आहे.
बस भाड्यात वाढ झाल्यानंतर मोठ्या संख्येने कमी अंतराचे प्रवासी शेअर ऑटोकडे वळले. त्यामुळे बेस्टकडून हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येते. भाडेवाढीनंतर प्रवासी संख्येत तीन लाखाची घट झाल्याचे बेस्टने जाहीर केले. पण प्रत्यक्षात हा आकडा पाच लाखपेक्षा जास्त होता. बसची भाडे व्यवस्था अधिक लवचिक करण्यासाठी आम्ही नवीन स्लॅब जोडण्याची शक्यता विचारात घेत आहोत. यामध्ये, ऑटोचे स्पर्धात्मक भाडे देखील विचारात घेतले जाईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्ही आर श्रीनिवास यांनी यासंदर्भात म्हटले आहे.
राज्यातील सरकारी संस्था असलेल्या बेस्टच्या बसेसमध्ये दररोज 25 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. मुंबईत 9 मे पासून बेस्ट बसेसची भाडेवाढ करण्यात आली. 2019 पासून 9 मेपर्यंत बेस्टच्या नॉन-एसी आणि एसी बसेसचे किमान भाडे अनुक्रमे 5 रुपये आणि 6 रुपये होते.
बस भाड्यात अलिकडेच झालेल्या वाढीमुळे प्रवाशांचा ट्रेंड शेअर-ऑटोकडे वाढला आहे. विशेषतः फीडर मार्गांवर आणि लहान प्रवासात, प्रवाशांनी ऑटोला स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय मानले. त्यामुळे अशा प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट आता पुन्हा एकदा भाडे कमी करण्याची तयारी करत आहे. लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि नवीन दर लागू केले जाणार आहेत.