

मुंबई : बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन म्हणजेच कामगारांची सत्ता आली असली तरी, युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी भाजपशी उघडपणे हात मिळवणी केल्यामुळे सोसायटीमध्ये आता विरोधकच उरणार नाहीत.
बेस्टमध्ये शिवसैनिक विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणार्या कामगारांची संख्या सर्वाधिक असतानाही बेस्ट मध्ये दिवंगत कामगार नेते शरद राव यांनी आपली पकड मजबूत केली. रावांच्या एका इशार्यावर बेस्ट बंद पाडण्याची ताकद होती. बेस्ट वर्कर्स युनियनचे स्वतः अध्यक्ष असतानाही राव यांनी कधी युनियनला राजकारणाच्या दाव्याला बांधले नाही. पण कामगारांच्या हितासाठी राजकीय पक्षांना आताशी धरून राव यांनी राजकारण केले.
राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली. पण आपले राजकारण युनियनमध्ये येऊ दिले नाही. बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीतही राव यांनी स्वतःच्या हिमतीवर संचालक मंडळ निवडून आणले होते. त्यामुळे क्रेडिट सोसायटीवर रावांची सत्ता असावी यासाठी बेस्ट वर्कर्स युनियनच्या पॅनलला कामगारांनी डोळे बंद करून मतदान केले. त्यामुळे सलग नऊ वर्ष सत्ता असणार्या शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.
या निवडणुकीत भाजपा नेते प्रसाद लाड यांनी स्वतःचे पॅनल उभे केले होते. यासाठी शिवसेना शिंदे गट, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समर्थ कामगार संघटना व अन्य संघटनेचा पाठबळ घेतले. पण कामगारांनी यावेळी ठरवूनच टाकले होते राजकीय पक्षाला बेस्ट मध्ये प्रवेश द्यायचा नाही. त्यामुळे वर्कर्स युनियनच्या पारड्यात मते टाकली. मात्र मात्र पतपेढी हाती येताच राव यांनी भाजपाचे नेते अॅड. आशिष शेलार यांची भेट घेतली.
वर्कर्स युनियनचे सर्वाधिक संचालक निवडून आल्यानंतर अॅड. आशिष शेलार यांनी शशांक राव यांची मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे विरोधी मोहिमेचे स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणाही केली. त्यामुळे वर्कर्स युनियनही भाजपाचीच होती, हे आता स्पष्ट झाले आहे. ओेघानेच क्रेडिट सोसायटीची सत्तासुत्रेही भाजपाकडेच गेल्याने सोसायटीमध्ये एकही विरोधक उरलेला नाही.
सुहास सामंत यांच्यावर कामगारांची नाराजी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ कामगार नेते सुहास सामंत यांच्यावर गेल्या काही वर्षापासून बेस्ट कामगार नाराज होते. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य असतानाही सामंत यांनी कामगारांच्या हितासाठी फारसे योगदान दिले नसल्याचा आरोप कामगारांचा आहे. त्यामुळे क्रेडिट सोसायटीची निवडणूक सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढवू नये, अशी काही कामगारांची मागणी होती. परंतु सामंत यांनी स्वतःच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यामुळे कामगार वर्ग नाराज झाला. याचा मतांवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.