

राजेश सावंत, मुंबई
बेस्टच्या क्रेडिट सोसायटी संचालक पदाच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला आहे. सलग 9 वर्ष क्रेडिट सोसायटी हातात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला स्वप्नातही वाटलेही नसेल, ही सोसायटी आपल्याला गमवावी लागेल; पण अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या हातातून क्रेडिट सोसायटी निसटली आहे. ही निवडणूक ठाकरे गटासह भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीमध्ये शिवसेना पॅनेलची ताकद वाढावी यासाठी उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्रित आले; तर दुसरीकडे भाजपचे नेते प्रसाद लाड व त्यांच्या पॅनेलने बेस्ट आगार पिंजून काढले.
बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष कामगार नेते शशांक राव यांनीही थेट कामगारांची संवाद साधून, क्रेडिट सोसायटीवर कामगारांचे राज्य असावे हे पटून दिले. या निवडणुकीत भाजपाचे स्वतंत्र पॅनेल असले, तरी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून रावांना छुपा पाठिंबा होता. यात भाजपाचे मुंबई अध्यक्ष ड. आशिष शेलार, भाजपा नेते प्रवीण दरेकर आघाडीवर होते. पण शेवटपर्यंत राव यांनी कामगारांना भाजपसोबत असलेली मैत्री दाखवून दिली नाही. दिवंगत कामगार नेते शरद राव यांना मानणारे बेस्टमध्ये अनेक कामगार आहेत. त्यामुळे वर्कर्स युनियनला बळ देण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवली. त्यामुळे रावांच्या पॅनलला 21 पैकी सर्वाधिक 14 जागा जिंकता आल्या. तर भाजपाने वैयक्तिक पातळीवर केलेल्या प्रचारामुळे त्यांच्याही 7 जागा निवडून आल्या. निवडणूक पार पडेपर्यंत व निकाल लागेपर्यंत शशांक राव यांनी आपण भाजपावासी असल्याचे दाखवून दिले नाही. पण क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून आल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आशिष शेलार यांनी राव यांचे अभिनंदन केले. अभिनंदन पुरते ठीक होते. मात्र त्यानंतर स्वतः शशांक राव यांनी निवडून आलेल्या संचालकांसोबत थेट शेलार यांची जाऊन भेट घेतली. एवढेच काहीतरी शेलार यांनी राव यांची भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून घोषणाही केली. त्यामुळे क्रेडिट सोसायटी निवडणुकीत राव व भाजपाची युती होती हे स्पष्ट झाले आहे.
बेस्टमध्ये सर्वाधिक कामगार शिवसैनिक असून येथे शिवसेना ठाकरे गटाची पकड मजबूत आहे. बेस्ट कामगार सेना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचे नेतृत्व करीत आहे. पूर्वी या युनियनच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री नारायण राणेही होते. परंतु राणे अन्य पक्षात गेल्यानंतरही येथील कामगार शिवसेनेतच राहिले. त्यामुळे क्रेडिट सोसायटीवर सर्वाधिक काळ शिवसेनेची सत्ता राहिली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या क्रेडिट सोसायटीत सत्ता सोडाच एक जागाही जिंकून आणता आली नाही. यामागे अंतर्गत वादच नाही तर, कामगार नेते सुहास सामंत यांचे नेतृत्वही अनेकांना मान्य नव्हते. सामंत यांच्याकडे नेतृत्व सोपवू नका, अशी मागणीही बेस्टमधील काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर केली होती. परंतु सामंत हे सुरुवातीपासून मातोश्रीशी एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना हटवण्यात आले नाही. या रागामुळे ज्येष्ठ शिवसैनिक दुखावले गेले. याचा परिणाम मतांवर झाला. पण काही जो जीता वही सिकंदर.. त्यामुळे बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये रावांच्या रूपाने का होईना, कधी नव्हे ती भाजपची सत्ता आली आहे.
क्रेडिट सोसायटीची धामधूम सुरू असतानाच अचानक आर्थिक गुन्हे शाखेमार्फत क्रेडिट सोसायटीच्या जुन्या कारभाराची चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे क्रेडिट सोसायटीत अनेक वर्ष सत्ता भोगणार्या शिवसेना ठाकरे गटाच्या संचालकांचे टेन्शन वाढले होते. स्वतःच्या बचावासाठी शिवसेना ठाकरे गटाचे 6 संचालक भाजपात दाखल झाले होते. त्यामुळे भाजपाच्या प्रसाद लाड गटाला याचा मोठा फायदा झाला.