

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन आणि पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनामुळे रविवारी मुंबईतील बेस्ट बस वाहतुकीची मोठी कोंडी झाली. आंदोलकांचा प्रचंड जमाव आणि विसर्जन मिरवणुकांमुळे बेस्ट उपक्रमाला तब्बल 70 पेक्षा जास्त बसमार्ग वळवावे लागले, तर काही मार्ग बंदही करण्यात आले.
बेस्ट ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार, सकाळी 7.15 पासूनच सीएसएमटी, मॅडम कामा रोड, जगन्नाथ भोसले मार्ग, महापालिका मार्ग, एल.टी. मार्ग, दादर, मेट्रो सिनेमा आणि एम.जी. रोड परिसरात बस वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. रस्त्यांवरील गर्दी आणि पोलिसांनी केलेल्या बंदोबस्तामुळे 53, 5, 15, 82, 126, 138, 131, 103, 124 या बसमार्गांचे नियोजन बदलले. काही बसेस क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक, पोद्दार चौक, मेट्रो सिनेमा आणि शाहिद भगत सिंह रोडकडे वळवण्यात आल्या. तर दुपारी अडीच वाजल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरातील -112, -116 तसेच सीएसएमटी परिसरातील -138 हे मार्ग मोठ्या गर्दीमुळे पूर्णपणे स्थगित करण्यात आले. जुहू चौपाटीवरील 231 मार्गही थेट रद्द करण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे लालबाग, दादर चौपाटी आणि शिवाजी पार्क परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बेस्टने खास उपाययोजना केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील 1, 4, 6, 7, 8, 11, 15, 19, 21, 22, 25 हे मार्ग लालबाग फ्लायओव्हर मार्गे वळवले गेले. सकाळी 6 ते 7.20 आणि दुपारी 2 ते 2.35 वाजेपर्यंत या मार्गांत बदल केला आहे.
शिवाजी पार्क व विसर्जन मार्गावरून जाणार्या 72, 718, 706, 707, 709 या बसेसना ‘गोल्डन नेस्ट’ मार्गे वळवले. टँक रोडवरील 612, 606, 605 या बसेसना एल.बी.एस. रोडमार्गे वळवले.