

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव बीडीडी चाळ प्रकल्पातील पूर्ण झालेल्या पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील टॉवर क्रमांक 1, 2, व 3 मध्ये 537 पात्र रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांचे वितरण शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. नायगाव-दादरमधील टॉवर क्रमांक पाचच्या तळमजल्यावरील म्हाडा प्रकल्प कार्यालयात वितरण केले जाणार आहे.
राज्य शासनाचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील टॉवर क्रमांक 1 ते 3 ला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या विंगमधील 537 पुनर्वसन सदनिकांचे वितरण मंडळातर्फे करण्यात येणार असून पात्र रहिवाशांना वितरणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता सार्वजनिक सुट्टी सोडून रहिवाशांना वितरणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. निवासी सदनिकांचे वितरण टॉवर क्रमांक 2, 1, व 3 या क्रमाने करण्यात येणार आहे.
नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतींत एकूण 20 टॉवर बांधण्यात येत आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील एकूण 8 टॉवर्सपैकी 5 टॉवर्समधील 864 सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 मार्चला करण्यात आले होते.
असा आहे प्रकल्प
नायगाव बीडीडी प्रकल्पात 6.45 हेक्टर जागेवर तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळींमध्ये 3 हजार 344 भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे.
सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 2 बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे.