

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बॅगांची सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तपासणी केली. यानंतर या दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तपासाव्यात, असे आव्हान दिले आहे.
उद्धव ठाकरे सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील प्रचारसभांसाठी गेले होते. वणी येथील सभेसाठी जाण्याआधी त्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्यानंतर तेथे निवडणूक आयोगाचे अधिकारी आले. त्यांनी बॅगा तपासणार असल्याचे ठाकरे यांना सांगितले. ठाकरे यांनी तपासणीस परवानगी दिली. तसेच तपासणी करत असताना अधिकार्यांशी झालेला संवादही कॅमेर्यात चित्रीत केला. यावेळी ठाकरे यांनी अधिकार्यांना माझी बॅग तपासली तशी मोदी, शहा, शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्याही बॅगा तपासा. माझ्याप्रमाणे त्यांचेही चित्रण करा आणि मलाही पाठवा, असे सांगितले. ठाकरे यांनी अधिकार्यांसह कॅमेरामनची नावे विचारली. नंतर सभेत आणि सोशल मीडियावर ठाकरे यांनी या प्रकाराची माहिती दिली.
सांगली जिल्हा दौर्यात प्रचारसभेसाठी विटा येथे आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगेची आणि हेलिकॉप्टरमधील साहित्याची निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तपासणी केली. एक्स अकाऊंटवर डॉ. कोल्हे यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, तपासणी करणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. पण तपासणी फक्त विरोधी पक्षातील नेत्यांचीच का होते, हा प्रश्न आहे.