

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविल्या जात असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या (बी. फार्म.) दुसऱ्या फेरीची निवड यादी आज (१३ ऑक्टोबर) रोजी जाहीर होणार आहे. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी ४४ हजार २८७ जागांपैकी २७ हजार ५९० जागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यातच प्रथम वर्षासाठी प्रवेश बंदी केलेल्या १८ पैकी १३ महाविद्यालयांवरील बंदी उठविल्याने या महाविद्यालयांच्या जवळपास ८०० ते ९०० जागांची भर पडली आहे. विद्यार्थ्यांना १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील १७ऑक्टोबर रोजी जाहीर होईल.
पदविकेच्या दुसऱ्या फेरीसाठी १३ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी निवड यादी जाहीर होणार आहे. निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते १७ ऑक्टोबरदरम्यान जागा स्वीकृती करून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. १८ ऑक्टोबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.
38 महाविद्यालयांवरील प्रवेश बंदी उठवली
पायाभूत सुविधा नसल्याने भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने ८९ महाविद्यालयांतील २०२५-२६ मधील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचे आदेश दिले होते. मात्र यातील ३८ महाविद्यालयांनी निकषांच्या पूर्ततेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केल्याने त्यांच्यावरील प्रवेश बंदी उठविण्यात आली आहे. यामध्ये पदवीचे १३ तर पदविका अभ्यासक्रमाच्या २५ महाविद्यालयांचा समावेश आहे.