

मुंबई : मराठा आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहता मुंबई महापालिकेकडून सोयी सुविधांत वाढ करण्यात आली आहे. आझाद मैदान आणि परिसरातील रस्त्यांची 800 स्वच्छता कामगार सफाई करत आहेत तर 25 टँकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. यासह प्रसाधनगृहे, स्वच्छता, आरोग्य यासह सर्व पुरवण्यात येत आहेत. ए विभाग कार्यालयासह परिमंडळ एकमधील सर्व विभाग कार्यालये इतर संबंधित विभागांकडून अधिकचे मुनुष्यबळ कार्यरत आहे.
पिण्याचे पाण्याचे 25 टँकर्स
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे 25 टँकर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर्स मागविले जात आहेत. आझाद मैदान, महापालिका मार्ग, छ. शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे येलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहन तळ, वाशी जकात नाका अशा विविध ठिकाणी सदर टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
स्वच्छतेसाठी 800 कामगार तैनात
आंदोलनस्थळ व परिसरात सुमारे 800 पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचार्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे.दोन सत्रांमध्ये स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत.
आंदोलनस्थळी 4 रूग्णवाहिका
आझाद मैदान परिसरात 24 तास कार्यरत वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. यात 4 वैद्यकीय पथक व 4 रुग्णवाहिका मैदान परिसरात कार्यरत आहे.नायर रुग्णालयाकडूनही येथे वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे.आंदोलनकर्त्यांसाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
300 पेक्षा अधिक शौचकूप
आंदोलनकर्त्यांसाठी नियमित तसेच फिरती अशी दोन्ही प्रकारची प्रसाधनगृहे मिळून सुमारे 300 पेक्षा अधिक शौचकूपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. प्रसाधनगृहांमध्ये नियमितपणे स्वच्छता केली जात आहेत.