

मुंबई: पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील प्रतिष्ठित अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर आज शुक्रवारपासून (दि.२२) इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या 'महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणा'अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हरित वायूंचे प्रमाण नियंत्रणात आणणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या धोरणाची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू झाली असून, अटल सेतू हा टोलमाफी लागू होणारा पहिला मार्ग ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरही ही सवलत लागू होण्याची दाट शक्यता आहे.
या टोलमाफीचा लाभ विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार आहे. यामध्ये खासगी आणि प्रवासी वापरासाठी असलेल्या हलक्या चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या, इलेक्ट्रिक बसेस, राज्य परिवहन (ST) आणि इतर शहरी परिवहन उपक्रमांच्या प्रवासी बसेस या वाहनांचा समावेश आहे. मालवाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना या टोलमाफीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील इतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही यापूर्वीच करण्यात आली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना केवळ आर्थिक फायदा होणार नाही, तर राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेले हे पाऊल भविष्यात अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या निर्णयाचा थेट फायदा मुंबईतील मोठ्या संख्येने असलेल्या इलेक्ट्रिक वाहनधारकांना होणार आहे.
मुंबईतील सध्याची इलेक्ट्रिक वाहनांची आकडेवारी खालीलप्रमाणे:
हलकी चारचाकी: १८,४००
हलकी प्रवासी वाहने: २,५००
अवजड प्रवासी वाहने: १,२००
मध्यम प्रवासी वाहने: ३००
एकूण: २२,४००