सत्तेसाठी हालचाली वेगवान

Maharashtra Assembly Election : अपक्ष, छोट्या पक्षांशी महायुती, ‘मविआ’ची खलबते
Maharashtra Assembly Polls
विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे.File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. बहुतांश ‘एक्झिट पोल’चा कल भाजपच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या बाजूने आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा राहील. मात्र, खबरदारी म्हणून भाजपसह महायुतीतील बड्या नेत्यांनी अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांसोबत बोलणी करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीनेही सत्तास्थापनेसंदर्भात रणनीती तयार करून, संभाव्य पाठिंब्याची चाचपणी सुरू केली आहे. महायुती बहुमतापासून दूर राहिली, तर छोट्या घटकपक्षांची मोट बांधण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हे लक्षात घेऊनच महायुतीच्या नेत्यांची अपक्ष आणि छोट्या पक्षांसोबत बातचित सुरू झाली आहे.

फडणवीसांनी घेतली भाजप नेत्यांची बैठक

महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची सध्या सार्वजनिकरीत्या कोणतीही बोलणी सुरू नाहीत. मात्र, शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी दाखल झाले. अपक्षांशी आणि छोट्या पक्षांशी बोलणी करून सर्व गणिते जमवायची आहेत. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी निकाल स्पष्ट झाल्यानंतर महायुती अपक्ष आणि बंडखोरांशी बोलणी सुरू करेल, असे फडणवीस म्हणाले. मतदानाची आकडेवारी, बूथनिहाय झालेल्या मतदानाचा आढावा घेतानाच निकालानंतरच्या संभाव्य स्थितीवरही यावेळी चर्चा झाली. महायुतीतर्फे अपक्षांशी संपर्क साधला जात असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.

सत्ता स्थापण्यासाठी हालचाली

सर्वच प्रमुख ‘एक्झिट पोल’नी महायुती सत्तेत बसणार असे अंदाज वर्तविले असले, तरी महाविकास आघाडीने मात्र हे अंदाज फेटाळून लावले आहेत. महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा दावा करण्यात आला आहे.

अपक्ष आणि छोट्या पक्षांना सत्तेत वाटा देऊन सरकारसोबत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’ बाजूने असले, तरी भाजपने सावधगिरी बाळगल्याचे दिसून येते. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, बच्चू कडू यांची प्रहार संघटना यांच्याशी महायुतीच्या नेत्यांनी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपकडून हरतर्‍हेचे प्रयत्न केले जाऊ शकतात, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींकडून आमच्याशी संपर्क साधणे सुरू झाले आहे. मात्र, आम्ही अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. एकदा राज्याच्या निकालाचे कल हाती आले की, आम्ही निर्णय घेऊ, असे परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्च कडू यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपण सत्तास्थापन करणार्‍या पक्षासोबत जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर, महायुतीने छोटे पक्ष आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याची रणनीती आखली आहे.

‘मविआ’नेही कंबर कसली

दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही सत्तास्थापनेसाठी रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. महायुतीप्रमाणेच ‘मविआ’च्या नेत्यांकडून छोटे पक्ष आणि अपक्षांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमचेच सरकार सत्तेवर येणार, असा दावा ‘मविआ’च्या ज्येष्ठ नेत्यांकडून केला जात असला, तरी ‘मविआ’ने कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या