

मुंबई : पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी व वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे एकाच दिवशी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. तशी पत्रेही राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पाठवली. पण जोशी यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांची परवानगी नसल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे जोशी यांच्याकडे दिलेला अतिरिक्त भार कोणाच्या सांगण्यावरून सोपवण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक एसवीआर श्रीनिवास सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या महाव्यवस्थापकपदी नवीन सनदी अधिकार्यांची नियुक्ती न करता, 5 ऑगस्टला बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला. तसे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले. पण काही वेळात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने वस्तू व सेवाकर आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याचे पत्र देण्यात आले.
त्यामुळे एकाच दिवशी काही वेळेच्या अंतराने दोन वरिष्ठ सदस्य अधिकार्यांकडे बेस्ट महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. जोशी यांची ऑर्डर काढल्यानंतर त्यांनीच अतिरिक्त भार स्वीकारण्यास नकार दिला का, की मुख्यमंत्र्यांनीच जोशी यांची नियुक्ती रद्द केली ? जोशी यांच्याकडे या अगोदरही बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता. परंतु 5 ऑगस्टला दुसर्यांदा सोपवण्यात आलेला अतिरिक्त भार अवघ्या काही मिनिटात रद्द करून मुंबई महापालिका व वेस्ट उपक्रमाशी काही संबंध नसलेल्या शर्मा यांच्याकडे भार का सोपवण्यात आला, याचा उलगडा आतापर्यंत झालेला नाही.
अतिरिक्त भार अतिरिक्त आयुक्तांकडेच असतो
बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार आजवर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवरच सोपवण्यात आला होता. मुंबई महापालिकेत चार अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यामुळे कोणाकडेही अतिरिक्त भार सोपवला जाऊ शकत होता. मग अचानक सरकारने यातून अतिरिक्त आयुक्तांना बाजूला करून, त्या विभागाशी काही संबंध नसलेल्या सनदी अधिकार्याची नियुक्ती का केली?