

मुंबई : भक्तीचा सागर पंढरीकडे निघालाय अन् सगळीकडे घुमतोय ज्ञानोबा माऊली तुकराम तुकारामचा गजर...हाच गजर विरारमध्येही ऐकू येणार आहे आषाढ घन सावळा या भक्तीसंध्येत...शनिवारी (दि.5 जुलै) दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूजच्या वतीने पं. संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल गायकीने सजलेला भक्तीसंध्येचा कार्यक्रम रंगणार असून, श्रीविठुनामाचा गजरही या कार्यक्रमातही दुमदुमणार आहे.
वारी पंढरीच्या दिशेने निघाली आहे...लाखो वारकरी श्रीविठुनामाच्या गजरात तल्लीन झाले आहेत...संतांच्या अभंगवाणीने सगळीकडे भक्तीपूर्ण वातावरण रंगले आहे अन् भक्तीचा-नामस्मरणाचा गजर विरारमध्ये 5 जुलै शनिवार रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला घुमणार आहे. शनिवारी सायंकाळी 4ः30 वाजता विरार पश्चिमेला विवा महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत होणार्या या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून एकविरा कार्यालय, गणपती मंदिराच्या बाजूला विवा कॉलेज समोर विरार पश्चिम आणि बहुजन विकास आघाडी भवन, नालासोपारा विरार लिंक रोड, नालासोपारा पश्चिम या ठिकाणी प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेशिका उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पं. संजीव अभ्यंकर हे मराठी अभंगांसह काही हिंदी संतरचनाही सादर करणार आहेत. यातील बहुसंख्य रचना पं. अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केल्या आहेत. काही रचना संगीतकार केदार पंडित यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. पं. अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), पार्थ भूमकर (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. तर साईप्रसाद पांचाळ आणि रुद्रप्रताप दुबे हे स्वरसाथ करणार आहेत.
पं. अभ्यंकर यांची मराठी, हिंदी आणि संस्कृत या तीन भाषांमधील अनेक रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रसिकांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. भक्तीसंगीताच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले असून, पं. अभ्यंकर यांनी पूर्वजांनी केलेल्या रचनांचेच कार्यक्रम सादर करण्यात समाधान मानले नाही तर स्वत:च्या गायकीसाठी काही रचना बांधल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती केली आहे आणि त्यांचे 50 हून अधिक अल्बमला रसिकांची उस्फूर्त दाद मिळाली आहे, भक्तीसंगीताच्या क्षेत्रात त्यांनी नवनिर्मिती करुन मोठी भर घातली आहे.
संगीताच्या क्षेत्रात मोठे योगदान देणार्या पं. अभ्यंकर यांच्या भक्तीरचनांची स्वरानुभूती रसिकांना कार्यक्रमातून मिळणार असून, पं. अभ्यंकर हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून ते संत मीराबाई यांच्यापर्यंत अनेक संतांच्या रचना सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह संत मीराबाई आणि शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांच्या अभंग रचनांनी सजलेला आहे.
पुढारी आयोजित या आषाढ घनसावळा कार्यक्रमात मी स्वत: संगीतबद्ध केलेल्या काही संत रचना सादर करणार आहे, या रचना मी विविध रागांमध्ये बांधलेल्या असून, दिवसातल्या सर्व प्रहरांमधल्या रागांवर आधारित या अभंग रचना आहेत. त्यामुळे या रचनांमध्ये वैविध्य आहे.
पंडित संजीव अभ्यंकर