मुंबई : राज्यात अवयवदानाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने आशा सेविकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतून प्रत्येक घराघरात अवयवदानाचे महत्त्व पोहोचवले जाणार असून 80 हजार आशा सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अवयवदानाबाबत अजूनही समाजात भीती आणि गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक पुढे येण्यास टाळाटाळ करतात. आशा सेविका आता जनसामान्यांशी थेट संवाद साधून हे गैरसमज दूर करण्याची भूमिका बजावतील. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आशा सेविका अवयवदान प्रबोधन चळवळीत नवे बळ देतील.
राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना (रोटोसोटोचे) संचालक डॉ. आकाश शुक्ला यांनी सांगितले की, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या चिंताजनकरीत्या वाढली आहे. 2024 मध्ये 8,240 रुग्ण प्रतीक्षेत होते, तर आता ही संख्या 9,418 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे सात हजारांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील अवयवदान चळवळीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून जनजागृती वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.
अवयव प्रत्यारोपण समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जाणारे आशा सेविकांचे जनजागृती अभियान यामुळे या चळवळीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.