

Artificial lakes for Ganesh visarjan
मुंबई : उच्च न्यायालयाने 6 फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकांनी तलावांचे नियोजन केले आहे. मुंबई महापालिकेने 275 हून अधिक कृत्रिम तलाव उपल्बध करून दिले आहेत.
यंदा सहा फुटांखालील गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत पार पडावे आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची दक्षता मुंबई महापालिकेने घेतली आहे. जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाविकांनी घरगुती निसर्गस्नेही गणेशमूर्ती घरी बादली / पिंप यामध्ये विसर्जित करावे किंवा सोसायटीतील नागरिकांनी एकत्रितपणे व्यवस्था करुन मूर्ती विसर्जन करावे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्ती जवळच्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आले.
क्यूआर कोडवर शोधा घराजवळाचा तलाव
कृत्रिम तलावांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. तलावांची यादी पाहण्यासाठीचे क्यूआर कोड विविध माध्यमातून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यानुसार आपल्या घरानजीकचा तलाव शोधून तेथे मूर्ती विसर्जित करावी, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
श्रीमूर्तींचे विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेनेही 143 कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. नवी मुंबईत 22 पारंपरिक विर्सजन स्थळे असून दरवर्षी कृत्रिम तलाव उभारण्यात येतात. यावर्षीही नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागातर्फे निश्चित केल्या असून तेथे कृत्रिम तलाव उभारणी काम अंतिम टप्प्यात आहे. यात बेलापूर विभागात 20, नेरुळ 26, वाशी 16, तुर्भे 21, कोपरखैरणे 16, घणसोली 16, ऐरोली 18 व दिघा10 असे 143 कृत्रिम विसर्जन तलाव असणार आहेत.