

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अरमान खत्रीविरोधात अखेर अडीच वर्षांनंतर खटला चालणार आहे. आरोपी निश्चिती होण्याआधी गुन्हा रद्द करण्यासाठी अरमानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी त्या याचिकेवर तक्रारदार आणि सरकारतर्फे तीव्र आक्षेप घेण्यात आला. त्यावर अरमानने याचिकाच मागे घेतल्याने त्याच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला.
दोन वर्षांपूर्वी, फेब्रुवारी 2023 मध्ये दर्शन सोलंकीने आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यात दर्शनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन आठवड्यांनी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सोलंकीच्या खोलीत चिठ्ठी सापडली होती. त्याआधारे एसआयटीने अरमानला अटक केली होती. या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी अरमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
सुनावणीवेळी अरमानच्यावतीने अॅड. विजय हिरेमठ यांनी तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकिल प्रकाश साळसिंगीकर, तक्रारदारांतर्फे अॅड. संदेश मोरे आणि अॅड. हितेंद्र गांधी यांनी तीव्र विरोध केला. त्याची नोंद खंडपीठाने घेतली. याचदरम्यान अरमानच्या वकिलांनी याचिका मागे घेण्यास परवानगी मागितली.