

मुंबई : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळाडूंसाठीच्या सुविधा अद्ययावत कराव्यात. गणवेशाचा दर्जा, प्रशिक्षकांचे मानधन आणि भोजन दरात वाढ करावी, असे निर्देश क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी प्रशासलाना दिले. त्याचवेळी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय क्रीडामंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी क्रीडामंत्री भरणे म्हणाले, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविणे, क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठ स्थापन झाले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसे काम या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. तसेच कोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. याबरोबरच आता फुटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी, अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचा, फुटबॉल खेळाडूंचा, फुटबॉल प्रेमींचा आदर केला पाहिजे. त्यामुळे कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्त्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, कायाकिंग कनोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीबाबतचा प्रश्न मांडण्यासाठी काही खेळाडू यावेळी आले होते. या खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीचा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेश क्रीडामंत्री भरणे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले दिले. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
कुस्तीपाठोपाठच फुटबॉलचे शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. शहरातील गल्ली-गल्लीत, पेठा-पेठांत, घराघरात फुटबॉल खेळाडू आहेत. शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलचा परीघ मात्र शहर आणि काही प्रमाणात गडहिंग्लजपुरताच मर्यादित राहिला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणार्या कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंची संख्या मोजकीच आहे. दरवर्षी ती वाढणे अपेक्षित आहे. मात्र, तसे चित्र शहरात कधीच दिसत नाही. आता कोल्हापुरातच फुटबॉल प्रबोधिनी होणार आहे. यामुळे हे चित्र बदलेल अशी आशा आहे. प्रबोधिनी सुरू झाल्यामुळे नवोदित फुटबॉलपटूंना भरघोस प्रोत्साहन व पाठबळ मिळणार आहे. प्रबोधिनीत शालेय फुटबॉलपटूंना अत्याधुनिक टर्फ मैदानासारख्या सुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, सकस आहार, योग्य व्यायाम, खेळातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आदी सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. परिणामी खेळात आणखी सुधारणा होईल. कोल्हापूरच्या फुटबॉलला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळेल.