

मुंबई : हिंदी भाषा सक्तीविरोधात पुढील तीन महिन्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर,नागपूर,वर्धा, कोल्हापूर आदी जिल्हयात जाऊन महाराष्ट्रभर जाऊन जनजागृती करण्यात येईल.हा लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या आंदोलनात सोमवारी मुंबई येथे करण्यात आला.
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही.पण; हिंदीची सक्ती कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराही आझाद मैदानात यावेळी राजकीय नेते,शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिनी दिला.हिंदी भाषेसाठी नेमलेल्या अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या समितीला विरोध आहे.त्यामुळे ही समिती बरखास्त करावी अशीही मागणी यावेळी करण्यत आली.
समन्वय समिती निमंत्रक प्रा.डॉ.दीपक पवार व अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.आंदोलनाला कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,खासदार प्रा.वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड,माजी मंत्री यशोमती ठाकूर,भाकप,माकप सह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित दर्शवून आंदोलनाला दिला.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,हिंदू,हिंदी व हिंदुस्थान ही संकल्पना भाजपने आणली आहे.ती नागपूरच्या रेशीमबाग व मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरुन आली आहे.नरेंद्र जाधव समिती रद्द झाली पाहिजे.त्यांना मराठीचा अभ्यास नाही. ही लढाई सुरु राहिल ती आणखी जोमाने करायची असेल तर अन्य जिल्हयात जनजागृती झाली पाहिजे.त्यासाठी समन्वय समितीने आराखडा करावा.हिंदी सक्ती सरसकट रद्द असा शासन निर्णय काढला पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या,पहिलीपासून तिसरी हिंदी भाषा सक्तीचा हट्ट सरकार का करीत आहे.पहिल्यांदा मुलांना दर्जेदार शिक्षण द्या,त्यांना मुलभूत सुविधा द्या.मुलांना दर्जेदार शिक्षण दिले तर त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होतील.दुसरे म्हणजे,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी हिंदी सक्तीचा विषय पुढे आणला.त्यांचे ऐकून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे निर्णय घेतात. कोणतीही चर्चा न करता हा विषय पुढे आला.त्यामुळे मराठी व अमराठी हा लढा सुरू झाला आहे.मराठी अस्मिता जपली पाहिजे
चिन्मयी सुमित म्हणाल्या,ही जनचळवळ आहे.काँग्रेस,शिवसेना (उबाठा) व मनसे राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार ) या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला.हिंदी भाषेला विरोध नाही.पण;हिंदी सक्तीला विरोध आहे.पुढील टप्यात हे आंदोलन अधिक तीव्र करू.
त्यानंतर समारोप भाषणात प्रा.डॉ.दीपक पवार यांनी गेली 2 महिने यावर काम करतोय.त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला.खरेतर 20 वर्षापासून मराठी भाषेसाठी काम करतोय.पण;त्यावेळी प्रतिसाद मिळत नव्हता. हे बंद करावे असे वाटत होते.महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय काढला..त्यावेळेपासून या चळवळीला जोर धरला.याला विरोध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला.हा मराठी माणूसाचा विजय आहे.त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मी आभारी आहे.
गेली 30 ते 40 वर्षे मराठी समाज शांत होता.तो या निमित्ताने एकत्र आला.याचबरोबर समाज माध्यमाना ही याचे श्रेय जाते.त्यांनी आम्हाला पाठबळ दिले.तसेच सरकारने हिंदी सक्तीबाबत नियुक्त केलेले अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांना बालशिक्षण,बाल मानसशास्त्र माहित नाही.त्यांनी कोणाच्या मांडवाखाली जावे हे त्यांनी ठरवावे.जाधव यांची समिती कोठेही फिरणार नाही.पुढील 3 महिन्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल.मात्र;शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती नाशिक, छत्रपती संभाजीनगर,वर्धा,नागपूर आदी जिल्हयासह महाराष्ट्रभर हिंदी सक्ती भाषेविरोधात जनजागृती करणार आहे.
यावेळी माजीमंत्री यशोमती ठाकूर,प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, धनंजय शिंदे आदींनी मते व्यक्त केली.आंदोलनात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ,सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग होता.दरम्यान,मुंबई मराठी पत्रकार संघ व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी यांनी आंदोलनास्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.