

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून मला अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. मागील चार दिवसांत धमकीचे जवळपास सातशेहून अधिक फोन आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली समानिया यांनी रविवारी मुंबईत केला.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आपण ठोस भूमिका घेतली. या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यासह थेट धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आपल्याला हे धमकीचे फोन येत असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून मला अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे नावाचा व्यक्ती मला फोन करत आहे. नरेंद्र सांगळे शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत आहे. गेल्या चार दिवसांपासून मला सातशे ते आठशे लोकांचे फोन येऊन गेले, असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, फोनवर खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर ते समर्थक असल्याचे दिसते आहे. माझ्या विरोधात त्यांनी अश्लील कमेंटस् करायला सुरुवात केली आहे. मी मॉरिशसला स्कुबा डायव्हिंगला गेले होते. त्यातील एक फोटो फेसबुकवर टाकून अश्लील कॉमेंटस् केल्या आहेत. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.