

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि परळीतील वाल्मीक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील नेते एकमेकांवर राजकीय आरोप करत असताना आता मुंबईतून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत. 28 डिसेंबर रोजी वाल्मीक कराडविरोधात दमानिया ठिय्या आंदोलन करणार आहेत. कराडला अटक होईपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यातील आर्थिक संबंधाचे पुरावे दमानिया यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची 88 एकर जमीन एकत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यातील जमिनीच्या व्यवहाराचे सातबारेही दर्शविण्यात आले आहेत. या सातबार्यांत जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे आहेत. त्यात मुंडे व कराड यांची संयुक्त मालकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.