

मुंबई : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आल्याची घोषणा पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. यामुळे पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा मिळणार असून, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्या म्हणाल्या.
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 76.41 लाख पशुपालक कुटुंबांना होईल. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे 7 हजार 700 कोटी रुपये इतकी वाढ अभिप्रेत आहे, असे त्यांनी नमूद केले.
या निर्णयानुसार राज्यातील वीज दर आकारणी बिगरकृषी वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणण्याकरिता कृषी व्यवसायास ज्या दराने करआकारणी केली जाते, त्याच दराने करआकारणी करण्यात येईल. पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणार्या खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणार्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणार्या कर्जावरील व्याज दरात 4 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. त्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यपद्धती तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.