

Anil Parab On Ramdas Kadam's allegations : "बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्री मी केलं आहे. त्यांची एकूण संपत्ती किती हे मला माहिती आहे. मृत व्यक्तीचे ठसे घेतली तरी त्याचा काही उपयोग होत नाही; पण रामदास कदम यांचा मेंदू गुडघ्यात आहे. त्याचं ज्ञान कच्च आहे, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांच्या आराेपांना उत्तर दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले की, " बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम क्षणी मी तिथं २४ तास होतो. त्यामुळं या सगळ्या घटनेचा मी साक्षीदार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम क्षणी सर्व दिग्गज डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टर जाहीर करत नाहीत तोपर्यंत मृत्यू घोषित करता येत नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आम्ही प्रसार माध्यमांना बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. यावेळी अनिल परबांनी एक फोटो दाखवत बाळासाहेबांनी स्वतः हयातीत हाताचे मोल्ड बनवले आहेत, असहे सांगितले. रामदास कदम यांचा मेंदू गुडघ्यात आहे. त्याचं ज्ञान कच्च आहे, कारण मृत व्यक्तीच्या हातांचे ठसे घेवून काहीच उपयोग नसतो, हेच रामदास कदम यांना कळत नाही. त्याचं ज्ञान कच्च आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या ठशांबाबत केलेले सर्व आरोप १०० टक्के खोटे आहेत."
रामदास कदम हे आता बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास १४ - १५ वर्षांनी त्यांना कंठ फुटलाय. बाळासाहेब ठाकरे २०१२ ला गेले. त्यानंतर रामदास कदम हे २०१४ मध्ये मंत्री झाले.उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर तुम्ही मंत्रीपद घेतलंच का? असा सवाल करत २०१४ ते २०१९ या काळात कदमांनी मंत्रीपद भोगलं. २०१९ ला मुलासाठी आमदारकी घेतली. जोपर्यंत सारे मिळत होते तोपर्यंत सारे काही घेतले, असेही परब यावेळी म्हणाले.
राज्यात सध्या अतिवृष्टी झाली आहे. एकीकडे शेतकरी संकटात आहे. अशावेळी मूळ विषयापासून लक्ष विचलीत करायचं हे सुरू आहे. शिशूपालाचं १०० गुन्हे भरले आहेत;पण मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की ते या शिषूपालाला का वाचवत आहेत, असा सवालही परब यांनी केला. हे सगळं दारू पिऊन खेडमध्ये धुमाकूळ घालणार्याचा खरा चेहरा आगामी आधिवेशनात पुराव्यासह समोर आणणार असे आव्हानही परब यांनी कदमांना दिले.