

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) अटल सेतू, बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर आणि विक्रोळी येथील पादचारी पुलावरील फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. त्याबाबत लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.
अटल सेतूसह बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर आणि विक्रोळी येथील पादचारी पुलावर फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर या निविदांना कोणतेही ठोस कारण न देता वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. आलेल्या निवदांपैकी काहीजणांवर माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असून विशिष्ट कंत्राटदाराची निवड करण्यासाठी ही पद्धत अवलंबल्याचा आरोप परब यांनी केला आहे.
विक्रोळी येथे सुमारे 90 कोटी रुपयांची निविदा बंद होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही उघडण्यात आलेली नाही. सुरुवातीला 8 निविदाकार सहभागी असताना, दबाव टाकून 6 जणांना माघार घ्यायला लावण्यात आली आहे. आता केवळ 2 निविदाकार उरले असून ही निविदा विशिष्ट कंपनीलाच देण्याचा घाट एमएमआरडीए घालत असल्याचा आरोप परब यांनी केला. त्यामुळे या निविदा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी केली.