Anil Deshmukh| विदीप जाधव यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी, अशी विनंती माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बारामती विमानतळ परिसरात 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विदीप यांच्या पत्नी संध्या जाधव या सध्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (ठाणे) येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत आहेत. तथापि विशेष बाब म्हणून त्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, या अपघातानंतर देशमुख यांनी स्वतः सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे जाऊन संध्या जाधव यांचे सांत्वन केले होते.

