

मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त जय्यत तयारी केली आहे. अंगारकीनिमित्त दर्शनाची सुरुवात सोमवार (11 ऑगस्ट) मध्यरात्री 1.30 वाजता होणार असून, गाभार्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मार्ग, प्रवेशद्वार व दर्शन घेऊन बाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच भाविकांना मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीने दादर आणि प्रभादेवीतील मंदिर परिसर मंगलमय होणार असून, वातावरणात “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांचा निनाद घुमणार आहे.
अंगारकी संकष्टीनिमित्त मोठ्या प्रमाणात मंदिरात भाविकांची गर्दी असते. प्रभादेवीत दर्शनासाठी लाखो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. भाविकांना श्री दर्शन सुकर व्हावे यासाठी पोलीस आणि मंदिर न्यास प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. महिला आणि पुरुष भाविकांसाठी विशेष रांगा, त्याचबराबेर दोन प्रवेशद्वारांची तसेच रांगेकरिता मंडप व रेलिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, मौल्यवान वस्तू, पर्स, पूजा साहित्य आणू नये, असे आवाहनही न्यासाने केले आहे.
दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना पावसामुळे त्रास होऊ नये म्हणून मंडपाची सोय करण्यात आली आहे. मंडपात चहा, पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, पंखा, लाईट एलईडी टीव्हीवर सिद्धिविनायकाचे लाइव्ह दर्शन, आरोग्यसेवा अशा विविध सुविधा यावेळी मंदिर न्यासाकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम, दर्शन व्यवस्था आणि सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. चतुर्थी तिथी रात्री 9.17 वाजेपर्यंत राहणार असून, मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी वेळापत्रक, रांगा, सुविधा व मार्गदर्शनाची तयारी केली असल्याची माहिती मंदिर न्यास व्यवस्थापनाने माध्यमांना माहिती देताना सांगितले.