मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात तुडुंब भरणारा अंधेरी सबवे मुंबई महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे. पाणी तुंबल्यामुळे ठप्प पडणार्या वाहतुकीला पर्याय म्हणून मिलन सबवेप्रमाणे येथे उड्डाणपूलही उभारणे शक्य नाही. त्यामुळे तुंबणार्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी येथून जाणार्या मोगरा नाल्याचे रुंदीकरण हा एकमेव पर्याय ठरू शकतो.
सांताक्रुझ-विलेपार्ले दरम्यान असणार्या मिलन सबवेमध्ये तुंबणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना हाती घेतल्या. परंतु याचा काही फायदा झाला नाही. अखेर पाणी तुंबल्यामुळे ठप्प पडणार्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सबवेलगत रेल्वे मार्गावरून उड्डाणपूल उभारण्यात आला.
यातून वाहतूक सुरळीत झाली असली तरी, मिलन सबवेमध्ये दरवर्षी पावसाळ्यात तुंबणार्या पाण्याचा स्थानिक नागरिकांना आजही त्रास सहन करावा लागतो. अंधेरी सबवेही पावसाळ्यात पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. तासभर पाऊस पडला तरी हा सबवे पाण्याने पूर्णपणे भरून जात आहे. त्यामुळे या सबवेतून जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडते.
अंधेरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोड येथून अंधेरी पूर्वेला जाण्यासाठी हा सबवे जवळचा मार्ग आहे. पण दरवर्षी पावसाळ्यात किमान 25 ते 30 वेळा हा सबवे तुडुंब भरत असल्यामुळे वाहन चालकांना गोखले पूल, अथवा जोगेश्वरी उड्डाण पुलावरून ये-जा करावी लागते.
अंधेरी सबवेमध्ये तुंबणार्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा, यासाठी येथे पाणी उपसा पंपही बसवण्यात येतात. परंतु येथे पाणी तुंबण्याचा वेग जास्त असल्यामुळे पंपांचाही फारसा फायदा होत नाही. अनेकदा मोठा पाऊस झाला तर सबवेेतील पाणी थेट एस. व्ही. रोडपर्यंत येते. त्यामुळे हा रोडही वाहतूक कोंडीत सापडतो. याचा त्रास हजारो वाहन चालकांना दरवर्षी सहन करावा लागत आहे. तुंबणार्या पाण्याचा तातडीने निचरा करणे सध्या तरी शक्य नसल्यामुळे येथे उड्डाणपूल उभारता येईल का, याची चाचपणी झाली होती. पण पश्चिमेला पूल उतरण्यासाठी जागाच नसल्यामुळे उड्डाणपूल उभारणे शक्य नाही.
अंधेरी पूर्व येथील मोगरापाडा येथून वाहत येणारा मोगरा नाला अंधेरी पश्चिमेला अंधेरी सबवेखालून भरडावाडी परिसरापर्यंत येतो. पूर्वेला सुमारे 17 ते 18 फूट रुंद असलेला हा नाला पश्चिमेला साडेसात ते आठ फूट इतका निमुळता झाला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अंधेरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. यावर उपाय म्हणून नाल्याच्या रुंदीकरणाची व आवश्यक ठिकाणी वळवण्याची शिफारस चितळे समितीने केली होती. परंतु याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.