मुंबई : अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोडवर 35 एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असून या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला 2 लाख रुपयांचा दंड आता तो 87 कोटी करण्यात आला आहे. हा सर्व दंड वसूल करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरात कांदळवनाची कत्तल करून व सीआरझेडचे उल्लंघन करून भराव टाकण्यात आला आहे. 35 एकरवर सुमारे 6फुटांपेक्षा जाड भिंतही बांधण्यात आली आहे. पर्यावरण नियमांचे हे उल्लंघन असून हा भराव व भिंत काढून टाकावी. तसेच हा प्रकार करणार्यांवर एमपीडीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे केली होती.
मुंबईत मोकळ्या जागांवर अतिक्रमण होतेच पण त्याचबरोबर समुद्रकिनार्यांजवळ असलेली कांदळवने तोडून भूखंड बळकावण्याचे प्रकार वाढत आहेत. कांदळवनाच्या कत्तलीमुळे कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात नाश होत असून समुद्रकिनारी भागात पूर तसेच सुनामीसारख्या आपत्तींचा धोका वाढला आहे. समुद्राचे पाणी थेट शहरात घुसत आहे. याचा परिणाम मुंबईच्या पर्यावरणीय सुरक्षेवर होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करावी,अशी मागणी परब यांनी केली.
त्यावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. तसेच माझ्यासह या ठिकाणी वनमंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री तसेच इतर सदस्य पाहणी करू. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
लोखंडवाला बॅक रोडवरील कांदळवनाच्या जमिनीवर उषा मधू डेव्हलपर्स गृहनिर्माण संस्था आणि महालक्ष्मी एंंटरप्रायझेस यांनी भराव टाकले आहेत. त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई पुरेशी नाही. हे लोक कायद्याला जुमानत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली.