

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे जीवन संघर्षमय राहिलेले आहे. जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणांमुळेच ते पुन्हा मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही करायचे ते फडणवीस करू शकतात, असा राज्यातील जनतेचा विश्वास आहे. फडणवीस यांचीही तशीच धारणा आहे. त्यामुळेच ते पुन्हा आले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानात पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी अमृता फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शपथ घेतल्यानंतर फडणवीस हे पहिला लोकहिताचा निर्णय घेतील, असे ठाम विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले होते. यावरून फडणवीस यांना ट्रोल करण्यात आले होते. आता ते खरोखर पुन्हा आले आहेत. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, जेव्हा आपल्याला काही साध्य करायचे असते, तेव्हा अर्जुनासारखे केवळ लक्ष्य असले पाहिजे. फडणवीस यांना पुन्हा खुर्चीसाठी यायचे नव्हते. राज्यातील जनतेला विश्वास होता की, महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस जे काही करू शकतात, ते इतर कुणी करू शकत नाही. जनतेप्रमाणे त्यांचीही महाराष्ट्र हिताची धारणा आहे. या विश्वासासाठी ते पुन्हा आले आहेत. याचा मला आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या.