

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रासाठी महत्वाकांक्षी योजनांचे सुतोवाच करण्यात आले आहे. सिंचन आणि धार्मिक पर्यटनाभोवती योजनांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बनविण्यात येणार्या विशेष प्राधिकरणाला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, तापी महापुनर्भरण योजनेतून उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकर्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणो पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तर, दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल.
2027 मध्ये नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून केली. रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर, गोदातट परिसर पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटींची कामे हाती घेण्यात येतील.
19,300 कोटींचा तापी महापुनर्भरण सिंचन प्रकल्प हाती घेणार
49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार नार-पार-गिरणा नदीजोडमुळे
7,500 कोटी रुपये या प्रकल्पाची अंदाजित किंमत
3.55 टीएमसी पाणी मिळणार दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोडमुळे
9,766 हेक्टर क्षेत्र या नदीजोड प्रकल्पामुळे पुनर्स्थापित होणार
2,300 कोटी रुपये या प्रकल्पाची अंदाजित किंमत