

मुंबई : देवनार डम्पिंगची क्षमता संपल्याने मुंबईतील कचरा विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न मुंबई महापालिकेपुढे आहे. नागरिकांचा विरोध असल्याने तळोज्यातील डम्पिंग रखडले आहे. आता अंबरनाथमील 18 हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाली आहे.
अंबरनाथ येथील आदिवासी व अन्य नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या तरी येथे कचरा टाकण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पूर्व उपनगरातील मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर मुंबईतील कचर्याची कांजूरमार्ग व देवनार डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. मात्र कांजुर डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.
मुंबईतील डम्पिंग ग्राउंडची कचरा साठवण्याची क्षमता संपत आल्यामुळे महापालिकेने काही वर्षापूर्वी राज्य सरकारकडे कचर्याच्या विल्हेवाटीसाठी जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने तळोजा नवी मुंबई येथे जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु येथील नागरिकांच्या विरोधामुळे या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न तडीस गेला नाही. अंबरनाथ येथील सुमारे 18 हेक्टर क्षेत्रफळाची जागा आता मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील कचरा येथे टाकला जाऊ शकतो.
तळोजातील 12 हेक्टर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात
तळोजा येथे महानगरपालिकेला सुमारे 52.10 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी सुमारे 39.90 हेक्टर शासकीय जमीन असून 12.20 हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. शासनाच्या अखत्यारीत येणार्या जमिनीपैकी 38.871 हेक्टर शासकीय जमिनीचा ताबा शासनाने 18 जानेवारी 2016 मध्ये म्हणजे 9 वर्षापूर्वी महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला. यापैकी सुमारे 12 हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा फेब्रुवारी 2019 मध्ये महापालिकेला देण्यात आला.