

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी राज्यात स्वतंत्रपणे लढण्याचा नारा दिल्यानंतर गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पराभवासाठी थेट काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे. लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास आला होता. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान ते जिंकण्यासाठी नव्हे तर कोणते खाते मिळणार, कोणते कपडे घालायचे यावर चर्चा करत होते, अशी टीका दानवे यांनी केली. यामुळे ‘मविआ’त आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद समोर येत आहेत. यासंदर्भात दानवे यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधून विधानसभेच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले. लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचा एकमेकांना फायदा झाला. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस विधानसभेची निवडणूक जिंकू शकत होती, अशी स्थिती नक्कीच होती. मात्र, लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास आला. तथापि, हे पक्षाचे नव्हे, तर माझे स्वतःचे मत आहे. जागावाटपासाठी आयोजित बैठकीत काँग्रेसचे नेते कोणते खाते, कोणते मंत्रिपद मिळणार, यावर चर्चा करत होते. तसेच सर्व्हेच्या नावाखाली काँग्रेसने ज्या जागा घेतल्या, तिथे त्यांना डिपॉझिटही वाचवता आले नाही, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
लोकसभेत यश मिळाले आणि विधानसभेत अपयश आले म्हणून वेगळ्या भूमिका होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी सोडून शिवसेनेने एकटे लढावे, असे कोणीही म्हटलेले नाही. मात्र, शिवसेनेने आपली ताकद 288 मतदारसंघांत निर्माण केली पाहिजे, अशाप्रकारचा सूर सर्वांचा आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी 10 जण इच्छुक होते. जर ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले असते, तर आघाडीला आणखी 2-5 टक्के मते मिळाली असती. उद्धव ठाकरेही तेच म्हणाले होते. तेसुद्धा काँग्रेसने केले नाही. राज्यात उद्धव ठाकरेंची एक वेगळी प्रतिमा असून, मोठे जनमत त्यांच्यामागे आहे, असेही दानवे म्हणाले.