मुंबईः पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये २६० जागांचे वाटप निश्चित झाले असून २८ जागांवर अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबईतील तीन जागांसह विदर्भातील काही जागांवर वाद सुरू असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या आधी जागावाटप करून त्याची घो- षणाही केली होती. त्यामुळे त्यांचा फायदा झाला होता. विधानसभेसाठी आमचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत.
काँग्रेसने विधानसभेच्या २६० जागांचे वाटप ठरले असल्याचे स्पष्ट केले आहे. २६० जागांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ९० च्या आसपास जागा आल्या आहेत तर ठाकरे गटास ८० च्या आसपास व शरद पवार गटास ७० च्या आसपास जागा मिळाल्या आहेत.
मुंबईतील वांद्रे पूर्व, वर्सोवा आणि भायखळा या तीन जागांवर वाद सुरू आहे. विदर्भातील दर्यापूर, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, चंद्रपूर शहर, रामटेक, तुमसर, मराठवाड्यातील गे- वराई, उदगीर, परळी अशा जागांवर रस्सीखेच सुरू आहे. दर्यापूर, रामटेक, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, चंद्रपूर शहर या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तर यातील काही जागांसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटही आग्रही आहे.
गेवराई, परळी, या जागा शरद पवार गट मागत आहे. तर उदगीरची जागा ठाकरे गटाला हवी आहे. त्यामुळे अशा २८ जागांवर जोरदार रस- सीखेच सुरू आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाची बैठक सुरू आहे.
२८ पैकी काही जागांवरील तिढा सुटेल. मात्र ७/८ जागांचा वाद शेवटपर्यंत रंगणार आहे. याबाबतचा वाद दिल्लीपर्यंत जावू शकतो. मित्रपक्षांना आपल्या कोट्यातील जागा देण्याचे ठरले आहे.
समाजवादी पक्षाला काँग्रेस आपल्या कोट्यातून तीन जागा देण्यास तयार आहे. मात्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी, १२ जागांची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही वेगळे लढू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाला जागा दिल्या जातील. आघाडी आपल्या जागावाटपाची घोषणा दोन दिवसात करणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे गुरुवारी सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गुरुवारी विद्यमान आमदारांची तातडीची बैठक 'मातोश्री'वर बोलवली होती. या बैठकीत ठाकरेंच्या १५ विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जाते.
या आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला सुनील प्रभू, रमेश कोरगांवकर, सुनील राऊत, राजन साळवी, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, कैलास पाटील, भास्कर जाधव व शंकरराव गडाख आदि उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला उपस्थित नव्हते, असेही या नेत्याने सांगितले.