

मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, तसेच यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्रिपद भूषविले होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या सर्वांनी मोलाचे काम केले. देशाच्या विकासात योगदान देणार्या अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण येते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला अप्रत्यक्ष उत्तर दिले. त्यांनी गृहमंत्रिपदाची प्रतिष्ठा जपावी, असा सल्लाही पवार यांनी दिला.
शिर्डीत नुकत्याच झालेल्या भाजपच्या शिबिरात गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि शिवसेना ‘उबाठा’ गटाचे नेते उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे दगाबाजीचे राजकारण आपण गाडून टाकले आहे, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, भाषण करणे हा देशाच्या गृहमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र, थोडीफार माहिती घेऊन त्यांनी भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होत नाहीत.
1958 पासून मी राजकारणात आहे. मात्र, 1978 पासून त्यांनी माझी आठवण काढली. माझी आठवण काढणारी ही व्यक्ती 1978 मध्ये राजकारणात कुठे होती, हे मला माहीत नाही. 1978 मध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, अकोल्याच्या डॉ. प्रतिमाताई चौपे यांच्यासारखे कर्तृत्ववान लोक होते. या सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी चांगले योगदान दिले आहे. देशात आतापर्यंत वेगवेगळे पक्ष सत्तेत होते; पण राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता. त्यात अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची नावे घ्यावी लागतील. यापैकी एकाही नेत्याने अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केले नाही, ही भाजपच्या नेत्यांची पार्श्वभूमी होती. ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभटाची तट्टाणी,’ अशी म्हण सांगत पवार यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला.
माझ्यावर टीका करणारे हे गृहस्थ काही कारणांमुळे गुजरातमध्ये राहू शकत नव्हते. त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. याबाबतची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे जास्त सांगतील, असे पवार म्हणाले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता, ते म्हणाले, माझ्या भूमिकेपेक्षा याबाबतचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. राज्यात सुरू असलेल्या चर्चेची त्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे.
इंडिया आघाडीत देशपातळीवरील निवडणुकीत एकत्र येण्याचा उल्लेख होता. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावे, अशी आमच्यात चर्चा झालेली नाही. आता राष्ट्रीय मुद्द्यावर एकत्रित येण्याची गरज आहे. माझ्याकडून त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेस, ‘उबाठा’ शिवसेना आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून भूमिका घेता येईल का, याबाबत 8 ते 10 दिवसांत बैठक घेण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.