

मुंबई : डोंगरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदारांच्या सतर्कता आणि तत्परतेमुळे धारावीतील कामराज नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेची प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. प्रसूत महिला व तिचे बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती जे जे रुग्णालयातून देण्यात आली.
उमरखाडी, डोंगरी, सामंतभाई नानजी मार्ग मुंबई या ठिकाणी एक महिला प्रसूत होत असल्याचा कॉल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामुळे डोंगरी पोलिसांची ५ नंबर मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहोचली असता पोलिसांना मालादेवी महेश्वरन नाडर ही ३६ वर्षीय महिला प्रसूतीच्या वेदनेने फुटपाथवर विव्हळत असताना दिसली. तिचा पती महेश्वरन नाडर हा देखील तेथे उपस्थित होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डोंगरी पोलिसांनी आणखी एक मोबाईल व्हॅन मदतीसाठी बोलावून घेतली.
महिला पोलीस व इतर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी कपड्याच्या सहाय्याने प्रथम आडोसा केला. यावेळी गस्तीवर असलेले डोंगरी बीट मार्शल ४ वरील पोलीस अंमलव पो. शि. खडसे हे काही चादर व मदतीसाठी दोन स्थानिक महिलांना घेऊन आले. त्यानंत डोंगरी पोलिसांच्या ५ आणि १ नंबर मोबाईट व्हॅनमधील महिला पोलीस अंमलदारांनी दोन स्थानिक महिलांच्या मदतीने महिलेची यशस्वीरीत्या प्रसुती केली. प्रसूत महिला व तिच्या बाळास कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ केले.
बाळ व आई दोघेही सुखरूप !
प्रसूतीनंतर सदर महिला व बाळास नाळेसह कपड्यात गुंडाळून डोंगरी १ नंबर मोबाईल व्हॅमधून तत्काळ सर जे. जे. रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी नेले. तेथे कर्तव्यावरील डॉक्टरांनी बाळाची नाळ कापून सदर बाळ व बाळाच्या आईला तपासून दोघेही सुखरूप असल्याचे पोलिसांना सांगितले.
धारावीकरांकडून पोलिसांचे कौतुक
डोंगरी मोबाईल ५ वरील स्टाफ पोलीस निरीक्षक रासम, पो. शि. जाधव, पो. शि. सावंत, पो. शि. टेकाळे व डोंगरी मोबाईल १ वरील स्टाफ पोलीस निरीक्षक साबणे, एएसआय गायकवाड, हेड कन्स्टेबल फड या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सदर महिलेची प्रसुती व्यवस्थितपणे पार पडली. त्यांनी दाखवलेली सतर्कता आणि कार्यतत्परतेबाबत धारावीकरांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.