Political fraud : मंत्र्यांचे ओएसडी असल्याची बतावणी; सहा कोटींना गंडा
मुंबई : शासकीय रुग्णालयांसाठी लागणार्या बाराशे खाटांच्या कंत्राटाचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सहा कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे या पाच जणांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यातील नितीन हा तक्रारदार व्यावसायिकाचा कामगार सल्लागार तर इतर चौघे हे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले होते. दिडशे कोटीच्या कंत्राटाचे गाजर या व्यवसायिकाला दाखवण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
फसवणूक झालेले तक्रारदार हे विद्याविहार येथील रहिवासी असून त्यांचा लाकडी आणि मेटल फर्निचरचा व्यवसाय आहे. मार्च महिन्यात त्यांचा कामगार सल्लागार नितीन गुप्ताने त्यांची इतर आरोपींबरोबर भेट घडवून आणली.
यावेळी अरोपी रमेश बनसोडे हे माजी मंत्री, बालाजी पवार हे आरोग्यमंत्री तर उद्धव भामरे हे अन्न व औषध कार्यालयात ओएसडी तर कौस्तुभ हा वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत अशी ओळख करुन दिली. आरोपींनी शासकीय रुग्णालयांसाठी दिडशे कोटींचेे बाराशे आयसीयू खाटांचे कंत्राट देण्याचे आश्वासन दिले.
ही ऑर्डर त्यांच्या कंपनीला मिळाल्यास मोठा फायदा होणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले. कंत्राट देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना 30 कोटी तर इतर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांना कमिशन म्हणून सहा कोटी रुपये कमिशन द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारानके या पाचजणांना टप्याटप्याने सहा कोटी रुपये दिले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पाचही आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपींविरुद्ध तोतयागिरी करुन बोगस दस्तावेज सादर करुन सहा कोटीचा अपहार करुन तक्रारदार व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळाल्याचे शासन जीआर दिला. त्यात त्यांच्या कंपनीला बाराशे खाटांची ऑर्डर मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. हा जीआर त्यांनी त्यांच्या कायदेशीर सल्लागार यांच्याकडे दिला होता. त्यांनी शासनाच्या वेबसाईटवर त्याची शहानिशा केली असता त्यांच्याकडे असलेले शासन जीआर बोगस असल्याचे उघडकीस आले.

